वेंगुर्ल्यात समुद्रात बोट बुडाली; एक मच्छिमार बेपत्ता, दोघांना जीवदान
वेंगुर्ल्यात समुद्रात बोट बुडाली; एक मच्छिमार बेपत्ता, दोघांना जीवदान
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-केरवाडी परिसरात आज पहाटे अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत केरवाडी येथील राजन सारंग (वय ४६) हे बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरवाडी येथील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी सारंग आणि भाऊ राजन सारंग हे नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. दरम्यान पहाटे अचानक हवामान बदलून सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने त्यांची बोट समुद्रात बुडाली.
या वेळी प्रकाश सारंग आणि दाजी सारंग यांनी प्रसंगावधान राखत बोटीवरील ऑइल टँकरचा आधार घेतला. त्यानंतर परिसरातील दुसऱ्या मच्छिमार बोटीने त्यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र राजन सारंग यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. केरवाडी मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष काशिनाथ नार्वेकर यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.