पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार
नवी दिल्ली | प्रतिनिधी
समर्पित लोकसेवा आणि सामाजिक कार्यातून महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात विशेष सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन बोथे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री जनार्दन बोथे म्हणाले की, “देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र सदनात झालेला हा सत्कार माझ्यासाठी घरच्या कौतुकासारखा आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव आहे.”
ते पुढे म्हणाले की, अमरावती येथील गुरुकुंज आश्रम आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते देशाची संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळेच आज येथे पोहोचू शकलो.
यावेळी बोलताना निवासी आयुक्त आर. विमला यांनी जनार्दन बोथे यांच्या कार्याचे कौतुक करताना, महाराष्ट्राच्या मातीतून देशपातळीवर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याची संधी महाराष्ट्र सदनाला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
माहिती संचालक हेमराज बागुल यांनीही बोथे यांचे सामाजिक कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.


