UPSC यशस्वी उमेदवारांचा मुंबईत सत्कार; पुण्यातही प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव
UPSC यशस्वी उमेदवारांचा मुंबईत सत्कार; पुण्यातही प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश मिळविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करून देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेची भावना विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात.
राज्यात अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी केंद्रीय व राज्य सेवांमध्ये सहभागी व्हावेत यासाठी अशा संस्थांची व्याप्ती वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुणे येथे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे उपस्थित होत्या.