मालाडमध्ये उभारला जाणार जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

0
43

मालाडमध्ये उभारला जाणार जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता

मुंबई — मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती)च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उद्देश कंपनी (SPV) स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
प्रसार भारतीसोबत झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या संबंधित जागेवर एनडीझेड (No Development Zone) आणि सीआरझेड (Coastal Regulation Zone) नियम लागू असल्यामुळे मर्यादित वि
कास शक्य आहे. संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमध्ये आवश्यक बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, चित्रपट व दूरदर्शन निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित सुविधा, आयटी आणि आयटीईएस सेवा केंद्रे तसेच पर्यटन विकास प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म, मीडिया आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे विकसित करण्याचाही आराखडा आहे. या प्रशिक्षण केंद्रांसाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्याचा मानस असून त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पामुळे मुंबईचे चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील जागतिक स्थान अधिक मजबूत होण्यास मदत होईल, तसेच राज्याच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here