नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार’चा दर्जा
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार’चा दर्जा
नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्र शासनाकडून ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार’ (Market of National Importance – MNI) चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
या मान्यतेमुळे एकच व्यापार परवाना (Single Trading License) प्रणाली लागू होणार असून देशभरातील व्यापाऱ्यांना नागपूर बाजारातून सुलभपणे व्यापार करता येणार आहे. तसेच आंतरराज्यीय ई-व्यापाराला चालना मिळणार असून इतर राज्यांतील व्यापाऱ्यांना थेट खरेदी-विक्रीची सुविधा उपलब्ध होईल.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्याने नागपूर बाजारपेठेची देशव्यापी ओळख अधिक बळकट होणार असून कृषी मालाच्या विपणनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार आणि पारदर्शक व्यापार व्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना अधिक स्पर्धात्मक दर मिळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमामुळे कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेचा विस्तार होऊन शेतमालाची विक्री अधिक व्यापक स्तरावर करता येणार असून कृषी क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.