अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ तालुक्यातील महसूल कामकाजाचा घेतला आढावा
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ तालुक्यातील महसूल कामकाजाचा घेतला आढावा
कुडाळ, दि. ६ : महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट देत महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. क्षेत्रीय प्रशासन, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, ऑनलाइन दाखला प्रणाली तसेच विविध महसुली योजनांच्या अंमलबजावणीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दौऱ्याच्या प्रारंभी श्री. खारगे यांनी माणगाव महसूल मंडळातील बेनगाव येथे भेट दिली. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाअंतर्गत पारधी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या निर्णयामुळे समाजाच्या दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून सुरू असलेल्या रस्ते कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाच्या कामकाजाबाबत अभिप्रायही जाणून घेतला.
यानंतर त्यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, माणगाव तसेच मंडळ अधिकारी कार्यालय, माणगाव येथे भेट देऊन महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांना सेवा देताना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. महसूल सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.
दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, माणगाव येथील सेतू केंद्राला भेट देऊन शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध दाखला सेवांची माहिती घेतली. Government Process Reengineering (GPR) अंतर्गत ऑनलाइन दाखला प्रणालीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा आढावा घेताना या बदलांमुळे नागरिकांना सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
याशिवाय श्री. खारगे यांनी माणगाव येथील प्राचीन दत्त मंदिराला भेट देऊन मंदिराचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतले. स्थानिक वारसा जतन करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
महसूल सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी केले.