दुर्गराज रायगडाचे अखेरच्या श्वासापर्यंत संवर्धन हाच माझा ध्यास – युवराज संभाजीराजे छत्रपती
चौकट
बाराबंदी मावळे व नऊवारी रणरागिणींचा छबिना मिरवणुकीत सहभाग होता. राजसदर, होळीचा माळ, बाजारपेठ व जगदीश्वर मंदिर मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायास ध्वज अर्पण
शिवसमाधीस अभिवादन करून सोहळ्याची सांगता झाली.
………..
चौकट
दरम्यान, संयोगीताराजे छत्रपती यांनी शिवभक्तांशी संवाद साधला व सोहळा यशस्वी यशस्वी करणाऱ्या शिवभक्तांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांनी सर्व शिवभक्तांची
आपुलकीने चौकशी केली.
………..
रायगड, ता. ६ :दुर्गराज रायगडाचे अखेरच्या श्वासापर्यंत संवर्धन हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले.
दुर्गराज रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी रायगड संवर्धनाचा ठाम निर्धार व्यक्त करत स्वराज्यविचार, लोककल्याण आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश दिला.
संभाजीराजे म्हणाले, हा गड केवळ वास्तू नसून शिवछत्रपतींच्या स्वराज्यनिर्मितीचा साक्षीदार आहे, सर्व शाह्यांना पायाखाली तुडवून उभे राहिलेले स्वराज्य आणि लोककल्याणाचा विचार हाच खरा शिवविचार आहे. आताचा काळ हा शिवरायांचे सुराज्य नाही. सुराज्य साकारायचे असेल तर त्यासाठी शिवभक्तांची साथ महत्त्वाची आहे. ते म्हणाले, रायगडावर लवकरच लाईट अँड साऊंड शो होणार आहे. शिवभक्तांनी साथ द्यावी रायगडाचा विकास जोमाने करू. प्रतिकूल परिस्थिती असूनही शिवभक्तांची लक्षणीय गर्दी उसळणे शिवरायांचा वारसा जपण्याचे द्योतक आहे.’
आमदार अनिकेत तटकरे, डॉ.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार आभिजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हारिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आंचल दलाल, जिल्हापरिषद सदस्य, समिती कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, उपाध्यक्ष सत्यजित भोसले, अतुल चव्हाण, चैत्राली कारेकर, प्रशांत दरेकर, सचिव अमर पाटील, सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी प्रास्ताविक केले, कार्याध्यक्ष सुखदेव गिरी यांनी स्वागत केले तर संजय पोवार यांनी आभार मानले.
………….
दृष्टीक्षेपात….
– शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीने रायगड गजबजला
– छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या
– पालख्या राजसदरेवर वाजतगाजत दाखल
– सकाळी सात वाजता पोवाड्यांनी दरबार दणाणला
– शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नगारखान्यासमोर ध्वजवंदन
– कृषावर्त तलाव परिसरातील मंदिरात शिवलिंगपूजन
– संभाजीराजे व शहाजीराजे यांचे राजसदरेवर आगमन व उत्सवमूर्तीचे पूजन
– मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास सुवर्णमुद्रांचा अभिषेक
– मेघडंबरी व शिवसमाधी परिसरात शिवभक्तांची गर्दी
– रात्री उशिरापर्यंत गडावरून उतरण्यासाठी शिवभक्तांच्या रांगा


