कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट; विकासकामांचा घेतला आढावा
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट; विकासकामांचा घेतला आढावा
ठाणे : शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासनाची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत विविध विकासकामांचा आणि महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासन व प्रशासन हे सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत विशेष शासकीय प्रकल्प, भूसंपादन, जनगणना, घनकचरा व्यवस्थापन तसेच विविध विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने शहापूर तालुक्यातील चोंढे खुर्द येथे राबविण्यात आलेल्या ‘घोंगडी बैठक’ या अभिनव उपक्रमाचेही विभागीय आयुक्तांनी विशेष कौतुक केले.
बैठकीनंतर त्यांनी कोपरी येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालय, नागरी सेवा केंद्र आणि ठाणे तालुका क्रीडा संकुलाला भेट देऊन तेथील सुविधा, व्यवस्थापन आणि कामकाजाची माहिती घेतली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत प्रशासनाने जनहिताच्या योजनांना अधिक गती देण्याचे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले.