निराधार, वृद्धापकाळ व दिव्यांग योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन हयात दाखला बंधनकारक
निराधार, वृद्धापकाळ व दिव्यांग योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन हयात दाखला बंधनकारक
30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास अर्थसहाय्य थांबण्याची शक्यता; शासनाचा महत्त्वाचा निर्णय
सावंतवाडी, दि. १९ : संजय गांधी निराधार अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना तसेच विधवा, दिव्यांग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर आणि अनाथ लाभार्थ्यांसाठी शासनाने ऑनलाइन हयात दाखला सादर करणे बंधनकारक केले आहे. यासाठी BSA (Beneficiary Satyapan App) या नव्या प्रणालीद्वारे पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर (Rajendra Masurkar ) यांनी दिली.
शासनाच्या नव्या निर्देशानुसार, १५ जून २०२६ नंतर सर्व लाभार्थ्यांना ऑनलाइन हयात दाखला सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२६ पासून तलाठीमार्फत ऑफलाइन हयात दाखला सादर केलेल्या लाभार्थ्यांनाही आता नव्याने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
लाभार्थी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयामार्फत ही प्रक्रिया करू शकतात. वयोवृद्ध, अंथरुणाला खिळलेले, अंध किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कोतवाल घरी जाऊन हयात दाखला घेण्याची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दाखला काढण्यासाठी लाभार्थ्याने आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक किंवा पोस्टाचे पासबुक तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी QR कोड कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. यावेळी लाभार्थ्याची फेस रीडिंगद्वारे पडताळणी केली जाणार असून यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल.
२० जूननंतर BSA ॲपद्वारे प्रक्रिया सुरू होणार असून ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत ऑनलाइन हयात दाखला न दिल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हयात दाखला देणे बंधनकारक असून उत्पन्नाचा दाखला दर पाच वर्षांनी तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी विभागाकडे सादर करावा लागतो. सामाजिक कार्यकर्ते, बचत गट आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून सहकार्य करावे, असे आवाहन राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.