अलिबाग तालुक्यातील पोयनाडजवळील देहेन गावातील पुलाच्या रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मार्च २०२६ मध्ये पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले असून जुना पूल पाडून जवळपास दोन महिने उलटले तरी कामात कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने देण्यात आली. कामाच्या संथ गतीमुळे गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे अर्ज करून दखल घेण्याची मागणी केली; मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. आंदोलनापूर्वी झालेल्या बैठकीत ठेकेदाराने पर्यायी मार्ग तयार करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, त्या आश्वासनाला आता एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला असून अद्याप पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली आहे.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज सुमारे दीड ते दोन तास पायी चालावे लागत असून कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अमित पाटील, देहेन (पोयनाड, ता. अलिबाग) यांनी गावकऱ्यांच्या वतीने ही व्यथा मांडली आहे.