आमदार निधीतून बेलापूरमध्ये २५ लाख रुपयांचे योगा प्लॅटफॉर्म व निवारा शेड
आमदार निधीतून बेलापूरमध्ये २५ लाख रुपयांचे योगा प्लॅटफॉर्म व निवारा शेड
नागरिकांसाठी सुविधेचे लोकार्पण
नवी मुंबई
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या आधुनिक **’योगा प्लॅटफॉर्म व निवारा शेड’**चे लोकार्पण आज उत्साहात पार पडले. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये खर्चून सीबीडी बेलापूर सेक्टर-३ए येथील लायन्स पार्क उद्यानात ही सुविधा उभारण्यात आली आहे.
या नव्या सुविधेमुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि योगप्रेमींना नियमित योगाभ्यास, व्यायाम तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे. पावसाळा आणि उन्हाळ्यातही नागरिकांना या निवारा शेडचा लाभ घेता येणार आहे.
लोकार्पण सोहळ्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह नगरसेविका स्वाती गुरखे, सुरेखा नरबागे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, भाजपचे महामंत्री निलेश म्हात्रे, सीबीडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार तसेच विविध सामाजिक संस्था, योग संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले.