मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
संदीप चव्हाण सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष
मुंबई, दि. २८ : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवत सर्व १४ पैकी १४ जागांवर बाजी मारली. या विजयासह परिवर्तन पॅनलने संघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून संदीप चव्हाण यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
निवडणुकीत पत्रकार बांधवांनी संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत परिवर्तन पॅनलला स्पष्ट कौल दिला. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड होणे हे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामकाजाची पोचपावती मानले जात आहे.
नवीन कार्यकारिणीत शैलेंद्र शिर्के यांची कार्यवाह, स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे यांची उपाध्यक्ष, तर जगदीश भोवड यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.
संपूर्ण पॅनल विजयी झाल्यामुळे संघाचे कामकाज अधिक समन्वयाने आणि एकजुटीने पुढे जाईल, अशी अपेक्षा पत्रकार संघाच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या कार्यकारिणीसमोर पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय देणे, संघटन अधिक बळकट करणे आणि पत्रकार कल्याणासाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचे आव्हान असणार आहे.