अलिबाग तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनिल दशरथ थळे यांची नियुक्ती
अलिबाग तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनिल दशरथ थळे यांची नियुक्ती, कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत.
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, समाजाभिमुख कार्यकर्ते आणि विविध शैक्षणिक व सहकारी संस्थांशी निगडित असलेले सुनिल दशरथ थळे यांची अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुनिल थळे यांनी अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
ते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मापगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कायम संचालक, सुमती प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सेवा शक्ती पतपेढीचे संचालक तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे माजी ओबीसी अध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आले आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
अलिबाग तालुक्यातील नागरिकांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून त्यांना मान मिळत आला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, पक्षाला नवसंजीवनी मिळेल तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी अलिबाग तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुनिल दशरथ थळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
सुनील दशरथ थळे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे या नियुक्तीबद्दल आभार मानले आहेत.