राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भिकेकोनाळ परिसरातील पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भिकेकोनाळ परिसरातील पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
दोडामार्ग :
देशातून पोलिओचे संपूर्ण निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भिकेकोनाळ येथील अंगणवाडी केंद्रात रविवारी लसीकरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अंगणवाडी सेविका सौ. आदिती देसाई, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. विठ्ठल नाईक, सौ. किशोरी नाईक, आशा सेविका तसेच परिसरातील पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बालकांना पोलिओचे थेंब पाजून मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी पालकांना पोलिओ या आजाराबाबत माहिती देण्यात आली. पोलिओ हा बालकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारा आजार असून वेळेवर लसीकरण केल्यास त्यापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते, असे सांगण्यात आले. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओचे थेंब देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
भिकेकोनाळ परिसरातील पालकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका आणि पालक यांच्या सहकार्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.