'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला नवी गती
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला नवी गती
खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता
मुंबई, दि. २ :‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाविकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील सहा प्रादेशिक पर्यटन संस्थांच्या माध्यमातून भाविकांना प्रवास, निवास, भोजन, दर्शन तसेच इतर आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे तीर्थयात्रेचे नियोजन अधिक सोपे आणि सुकर होणार आहे.
या निर्णयामुळे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार सेवा मिळण्याबरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महसूलवाढीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासह राज्यातील तीर्थक्षेत्रांपर्यंत अधिकाधिक भाविक पोहोचण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.