रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कावजी वाडी (निधवली) येथे झालेल्या दरड दुर्घटनेत बाधित झालेल्या पाच कातकरी कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे.
दरड कोसळल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपदग्रस्तांना आवश्यक मदत, निवारा, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित विभागांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आणि आवश्यक शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी पावसाळ्याच्या काळात डोंगराळ आणि दरडप्रवण भागात विशेष खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.