वेंगुर्ला कोचरे: मातीतून देव घडवणारी दिव्यांका आर्ट्स गणेश चित्रशाळा

0
17
वेंगुर्ला कोचरे: मातीतून देव घडवणारी दिव्यांका आर्ट्स गणेश चित्रशाळा
वेंगुर्ला कोचरे: मातीतून देव घडवणारी दिव्यांका आर्ट्स गणेश चित्रशाळा

वेंगुर्ला कोचरे: मातीतून देव घडवणारी दिव्यांका आर्ट्स गणेश चित्रशाळा

सिंधुदुर्ग l अभिमन्यू वेंगुर्लेकर
कोकण म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि हस्तकलेचा संगम. आणि या संगमाच्या मध्यावर वेंगुर्ला तालुक्यातील कोचरे गावात एक अशी जागा आहे जिथे आजही मातीला देवपण दिले जाते. ही जागा म्हणजे दिव्यांका आर्ट्स गणेश चित्रशाळा.
ही परंपरा सुरू केली ती कोकणातील नावाजलेले मुर्तीकार शंकर दत्ताराम गावडे यांनी. त्यांच्या हात माती म्हणजे जिवंत व्हायची. त्याकाळी मुर्ती बनवण्यासाठी ते पुर्वा मळ्यातील खास माती आणायचे. ती माती चाळणे, तुडवणे, तिला आकार देणे यात अफाट मेहनत होती. पण त्यातून घडणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीत एक वेगळीच मातीचा सुगंध आणि आपुलकी असायची.
काळ बदलला. आता बहुतांशी ठिकाणी शाडू माती आणि कागदाच्या लगद्याचा वापर होऊ लागला आहे. हलकेपणा आणि बारकावे यासाठी ही माती सोयीची आहे. पण कोचरे येथील दिव्यांका आर्ट्समध्ये अजूनही काही ठिकाणी ती पारंपरिक मळ्यातील माती वापरली जाते. जुनं आणि नवं यांचा सुंदर मेळ इथे पाहायला मिळतो.
शंकर दत्ताराम गावडे यांच्यानंतर आता या चित्रशाळेची धुरा त्यांचे चिरंजीव दशरथ गावडे सांभाळत आहेत. कला त्यांना वडिलांकडून उपजतच मिळाली. लहानपणापासून वडिलांच्या सानिध्यात राहून त्यांनी जे अनुभवाचे धडे घेतले, त्याच भांडवलावर ते आज ही परंपरा जिवंत ठेवत आहेत. शेती आणि इतर कामातून वेळ काढून ते अत्यंत निष्ठेने मूर्ती घडवतात. शाडू मातीला असो की कागदाच्या लगद्याला, त्यांच्या हातून बाहेर पडणारा प्रत्येक बाप्पा सुबक आणि सजीव दिसतो.
दशरथ गावडे एकटेच नाहीत. त्यांच्या आजूबाजूचे अनेक युवकही या चित्रशाळेत येऊन मूर्तीकाम शिकत आहेत. वडिलोपार्जित ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ते शांतपणे करत आहेत. कारखान्यातून तयार होणाऱ्या मूर्तींच्या गर्दीतही हाताने, मेहनतीने घडवलेल्या मूर्तीला एक वेगळी किंमत आहे. कारण त्यात माणसाचा श्वास असतो, त्याग असतो आणि भक्ती असते.
गणेशोत्सव जवळ आला की या शाळेला एक वेगळीच शोभा येते. मातीचा वास, रंगांचा खर्रर आवाज आणि बाप्पाला आकार देताना दिसणारे शिल्पकाराचे डोळे… हे सगळे पाहून मन भरून येते.
आज पर्यावरणपूरक आणि पारंपरिक मूर्तींची मागणी वाढत आहे. अशावेळी दिव्यांका आर्ट्ससारख्या शाळा म्हणजे कोकणाच्या संस्कृतीचा खरा ठेवा आहेत. त्या केवळ मूर्ती विकत नाहीत, तर एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाणारी कला, श्रद्धा आणि मातीशी असलेले नाते जपतात.
जर तुम्हाला पर्यावरणपूरक, हाताने घडवलेली गणेश मूर्ती हवी असेल किंवा मूर्तीकलेचे धडे घ्यायचे असतील तर तुम्ही दशरथ गावडे, दिव्यांका आर्ट्स, कोचरे, वेंगुर्ला यांच्याशी संपर्क साधू शकता.
मोबाइल: 9421182653
बाप्पा यंदा घरी येताना त्याच्यासोबत मातीचा, मेहनतीचा आणि कोकणच्या परंपरेचा स्पर्शही घेऊन या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here