मोर्शीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या कामांना गती द्या - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मोर्शीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या कामांना गती द्या – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या बांधकाम प्रकल्पाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याचे निर्देश दिले.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्पातील प्रलंबित बाबी, अंमलबजावणीदरम्यान येणारे अडथळे आणि विविध विभागांमधील आवश्यक समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मत्स्यशेती, मत्स्य संशोधन आणि मत्स्य शिक्षण क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हे महाविद्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असून विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था एक मोठी शैक्षणिक संधी ठरणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.