नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीला गती; कामांतील अडथळे तातडीने दूर करा – हसन मुश्रीफ
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीला गती; कामांतील अडथळे तातडीने दूर करा – हसन मुश्रीफ
मुंबई :
राज्यातील गोंदिया, नंदुरबार, अलिबाग, बुलढाणा, जालना, धुळे आणि हिंगोली येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांच्या उभारणीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने वेगाने सुरू असून सर्व प्रकल्पांचा नियमित आढावा घेऊन कामांतील अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्याच्या प्रत्येक भागात आधुनिक आरोग्य सुविधा आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत प्रत्येक प्रकल्पातील भौतिक व आर्थिक प्रगती, निधीची उपलब्धता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, फर्निचर, आवश्यक परवानग्या तसेच इतर पायाभूत सुविधांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. संबंधित यंत्रणांनी सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
गोंदिया, नंदुरबार, अलिबाग, बुलढाणा, जालना, धुळे आणि हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकाम प्रगतीचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे संबंधित जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवांचाही लाभ मिळणार आहे.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.