रत्नागिरीत महसूल मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा; "जनतेची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही!"
रत्नागिरीत महसूल मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा; “जनतेची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही!”
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी महसूल विभागाच्या आढावा बैठकीत कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. प्रलंबित महसुली प्रकरणे, नागरिकांच्या तक्रारी आणि विविध कामांतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “काम झेपत नसेल तर बदली करून घ्या; मात्र जनतेची गैरसोय आणि भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
बैठकीत कलम १५५, ७०(ब) व ८५ अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, अकृषक (NA) परवानग्या, वर्ग-२ ते वर्ग-१ जमीन रूपांतरण, जिवंत सातबारा, शेत पाणंद रस्ते, अतिक्रमण, समुद्रकिनारी घरे नियमितीकरण तसेच गौण खनिज व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला.
महसूल मंत्र्यांनी कलम १५५ अंतर्गत प्रलंबित प्रकरणे सात दिवसांच्या आत निकाली काढण्याचे आदेश देत, कामातील त्रुटी तातडीने दुरुस्त न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी नियमित गावभेटी घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा, दररोज ठराविक वेळेत लोकांना भेटावे आणि प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
महसूल विभागाचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतीमान करण्यावर भर देत बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रातील आदर्श महसूल प्रशासन असलेला जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख निर्माण झाली पाहिजे. पद आणि प्रतिष्ठा जपायची असेल तर जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करा.”
महसूल मंत्र्यांच्या या स्पष्ट आणि कडक भूमिकेमुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणा अधिक जबाबदारीने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, नागरिकांनाही प्रलंबित कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली