“खड्डे बुजवा, अन्यथा उपोषण!” — पत्रकार आबा खवणेकरांचा इशारा

0
5
"खड्डे बुजवा, अन्यथा उपोषण!" — पत्रकार आबा खवणेकरांचा इशारा; कालवी रस्त्याच्या दुरवस्थेवर सभापती संतोष साटविलकर संतप्त
"खड्डे बुजवा, अन्यथा उपोषण!" — पत्रकार आबा खवणेकरांचा इशारा; कालवी रस्त्याच्या दुरवस्थेवर सभापती संतोष साटविलकर संतप्त

“खड्डे बुजवा, अन्यथा उपोषण!” — पत्रकार आबा खवणेकरांचा इशारा

कालवी रस्त्याच्या दुरवस्थेवर सभापती संतोष साटविलकर संतप्त

गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्तीचे आदेश; १५ दिवसांत काम पूर्ण करण्याची सूचना

वेंगुर्ला | प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या कालवी तिठा ते कालवीबंदर मार्गाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
यावेळी माणगाव जिल्हा परिषद सदस्य रूपेश कानडे उपस्थित होते. खवणेकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत, “येत्या १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू,” असे सांगितले.
गणेशोत्सव आणि पर्यटनावर परिणाम
आदुर्ले व केळूस ग्रामपंचायत हद्दीतून जाणारा हा रस्ता कालवीबंदर समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि पर्यटकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
येत्या १४ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक आणि गणेशभक्त मूर्ती घेऊन या मार्गावरून प्रवास करणार आहेत. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सभापतींची अधिकाऱ्यांना फटकार
पत्रकारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी संबंधित अधिकारी सुहास टेमकर आणि म्हाडेश्वर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले.
या रस्त्यावरील सर्व खड्डे त्वरित बुजवावेत. कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, “उपोषण करू नका, आम्ही काम करून दाखवतो,” असे आश्वासनही त्यांनी खवणेकर यांना दिले.
दरम्यान, निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास उपोषण अटळ असल्याचा पुनरुच्चार पत्रकार आबा खवणेकर यांनी केला आहे.
दोन वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याला आता तरी न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण वेंगुर्ले तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here