शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी; २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी; २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक ज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची आणि आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये युरोपमधील फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन तसेच चीनमधील कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पोचा अभ्यास दौरा प्रस्तावित करण्यात आला आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्यांना स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करावा लागणार आहे.
योजनेसाठी अर्जदाराचा मुख्य व्यवसाय शेती असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक असून अर्ज करताना वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
अर्जदाराकडे किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असावा. तसेच एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कंत्राटदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यापूर्वी शासकीय अर्थसाहाय्याने परदेश अभ्यास दौरा केलेल्या व्यक्तींनाही या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.
जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड व्हिडिओग्राफीसह पारदर्शक पद्धतीने सोडत (लॉटरी) काढून करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत किमान एक महिला शेतकरी तसेच एक राज्य अथवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य राहणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र, आधार कार्ड, फार्मर आयडी, पासपोर्ट प्रत, रेशन कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.