34,732 कोटींची विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई/नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी कुंभमेळ्याची तारीख निश्चित झाल्याने विकास आराखड्यातील सर्व कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.
बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी तयार करण्यात आलेल्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या आराखड्यातील विविध पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकासकामांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 यशस्वी आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.