दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या रुग्णासाठी चिंदरच्या विश्वनाथ दळवीं यानी सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान...!
दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या रुग्णासाठी चिंदरच्या विश्वनाथ दळवीं यानी सामाजिक बांधिलकी जपत केले रक्तदान…!
जिल्हा रुग्णालयाच्या तत्परतेने वाचले रुग्णाचे प्राण
आचरा – विवेक परब
दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुप’ च्या रुग्णासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तकेंद्राने दाखविलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी जपत श्री. विश्वनाथ दत्तात्रय दळवी यांनी केलेले रक्तदान कौतुकास्पद ठरले आहे. अवघ्या काही तासांत दुर्मिळ रक्तगटाचा रक्तदाता शोधून रक्त उपलब्ध करून देण्यात जिल्हा रुग्णालयाच्या रक्तकेंद्राला यश आले.
दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी देवगड येथील डॉ. किरण मराठे यांच्या रुग्णालयातून एका रुग्णाला जिल्हा रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीदरम्यान रुग्णाचा रक्तगट दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असल्याचे आढळून आले. त्यानंतर रक्तकेंद्रातील तज्ज्ञांनी सविस्तर तपासण्या करून हा रक्तगट ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असल्याची खात्री केली.
रुग्णाची गरज लक्षात घेता जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अर्जुन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. भारती ठोंबरे, डॉ. समीर मुलतानी, डॉ. उन्नती लटकर तसेच रक्तकेंद्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने रक्तदात्याचा शोध सुरू केला.
जिल्हा रुग्णालयाच्या अत्यंत वेगवान ऑनलाईन ब्लड सेंटर प्रणालीच्या माध्यमातून काही तासांतच योग्य रक्तदात्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर श्री. विश्वनाथ दत्तात्रय दळवी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता, “मी अर्ध्या तासात रक्तकेंद्रात पोहोचतो,” असे सांगत तातडीने रक्तदानासाठी धाव घेतली.
रात्री ९.०७ वाजता रक्तदात्याच्या आवश्यक सर्व वैद्यकीय व रक्तसुसंगतता चाचण्या पूर्ण करून रक्तपिशवी संबंधित रुग्णासाठी इश्यू करण्यात आली. त्यामुळे दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध होऊन उपचाराची प्रक्रिया अधिक वेगाने पार पडण्यास मोठी मदत झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत रक्तकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर मुलतानी, वैज्ञानिक अधिकारी श्री. साई सावंत, श्री. पवन हराळे, श्री. विशाल जाधव, नर्सिंग ऑफिसर श्री. सुमंगल बुगडे, रक्तकेंद्र तंत्रज्ञ भक्ती शिरसाठ, सहाय्यक अधिकारी कांचन परब, तसेच रक्तकेंद्रातील अन्य कर्मचारी
संदेश रावले, विठ्ठल पाताडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दुर्मिळ रक्तगटाचा रुग्ण समोर आल्यानंतर तातडीने रक्तदात्याचा शोध, संपर्क आणि रक्त उपलब्ध करून देण्याची जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्राची कार्यतत्परता तसेच कोणताही विलंब न करता रक्तदान करणारे विश्वनाथ दळवी यांची सामाजिक बांधिलकी यामुळे ‘रक्तदान हेच जीवनदान’ या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.