शिरोडा येथील ताज हॉटेल प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा
शिरोडा येथील ताज हॉटेल प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा
शिरोडा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला नवी उंची देणाऱ्या शिरोडा येथील आगामी ताज हॉटेल प्रकल्पाबाबत ताज हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत चटवाल यांच्याशी सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
जागतिक दर्जाची ओळख असलेल्या ताज समूहाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी अत्याधुनिक आणि दर्जेदार आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन नकाशावरील दर्जा अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, स्थानिक उद्योग-व्यवसायांना चालना मिळेल तसेच पर्यटनाशी संबंधित सेवा क्षेत्राचा विस्तार होईल. परिणामी जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे.
सिंधुदुर्गचा निसर्गसंपन्न किनारपट्टी भाग, ऐतिहासिक किल्ले, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षमता यांना जागतिक दर्जाच्या सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.