FSSAI ने छेडा स्पेशालिटी फूड्सचा परवाना निलंबित केला
अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अन्न सुरक्षा नियमांच्या गंभीर उल्लंघनप्रकरणी M/S Chheda Specialities Foods Pvt. Ltd. या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील साई नगर परिसरात असलेल्या कंपनीच्या उत्पादन केंद्रावर करण्यात आलेल्या अनुपालन मूल्यांकनात गंभीर त्रुटी आढळून आल्या.

छेडा स्पेशालिटी फूड्स ही कंपनी पिवळी केळी चिप्स, बटाटा वेफर्स, फराली चिवडा, कचोरी तसेच इतर विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी ओळखली जाते. १९९३ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मालक अशोक मुलचंद छेडा आणि किशोर मुलचंद छेडा आहेत.
FSSAI च्या तपासणीत संबंधित उत्पादन केंद्राला केवळ ४२ टक्के गुण मिळाले. स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि कीटक नियंत्रण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
FSSAI ने स्पष्ट केले आहे की, कंपनीने सर्व स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करून आवश्यक सुधारणा पूर्ण करेपर्यंत परवाना निलंबित राहील. तसेच कर्मचाऱ्यांचे सर्वसमावेशक प्रशिक्षण पूर्ण करणे आणि संपूर्ण नियामक अनुपालन सिद्ध करणे बंधनकारक असेल. सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतरच परवाना पुनर्स्थापित करण्याबाबत विचार केला जाईल.


