घरोघरी तिरंगा मोहिमेत स्वच्छतेसोबतच नशा मुक्ती व तंबाखू मुक्तीचा जागर

0
5
घरोघरी तिरंगा मोहिमेत स्वच्छतेसोबतच नशा मुक्ती व तंबाखू मुक्तीचा जागर
घरोघरी तिरंगा मोहिमेत स्वच्छतेसोबतच नशा मुक्ती व तंबाखू मुक्तीचा जागर

घरोघरी तिरंगा मोहिमेत स्वच्छतेसोबतच नशा मुक्ती व तंबाखू मुक्तीचा जागर

नवी मुंबई, दि. १२ :
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत सन २०२२ पासून देशभरात उत्साहात राबविण्यात येत असलेल्या ‘घरोघरी तिरंगा – हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राष्ट्रभक्तीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाबरोबरच नैतिक मूल्ये, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींची जपणूक व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
घरोघरी तिरंगा मोहिमेसोबतच सर्व महापालिका शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडून स्वच्छता शपथ घेण्यात आली. याचबरोबर नशा मुक्ती आणि तंबाखू मुक्तीबाबत सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थ्यांना घरातील कचऱ्याचे ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनेटरी अशा चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी तसेच याबाबत पालकांनाही जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.
नशा मुक्ती आणि तंबाखू मुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम पीपीटी सादरीकरणाद्वारे समजावून सांगण्यात आले. निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी तसेच जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी लहान वयापासूनच वाईट सवयींपासून दूर राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत शाळांच्या दर्शनी भागात स्वच्छता, नशा मुक्ती आणि तंबाखू मुक्ती विषयक प्रतिज्ञा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या दररोज पाहता येतील आणि त्यामधील संदेश सतत स्मरणात राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here