श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्या - मंत्री आदिती तटकरे
श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्या – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १२ : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रभावीपणे राबवून कचऱ्याची शास्त्रोक्त आणि योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना मंत्री तटकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रस्तावांवर चर्चा केली. यावेळी संबंधित तालुक्यांमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रीटमेंट प्लांट, ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प तसेच संरक्षण भिंत यांसारख्या आवश्यक बाबींचा समावेश करण्यात यावा. यामुळे कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल.
तसेच शहरांच्या प्रवेशद्वारांजवळ आणि प्रमुख रस्त्यांच्या कडेला कचरा साचणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करून स्वच्छता राखण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
रायगड जिल्ह्यातील किनारी तालुक्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.