निवृत्तीनंतरही पोलीस श्वान राहणार पोलिसांसोबतच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशील निर्णय
निवृत्तीनंतरही पोलीस श्वान राहणार पोलिसांसोबतच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरही श्वानांची देखभाल पोलीस दलाकडूनच; आहार व देखभालीचा खर्च गृह विभाग करणार
मुंबई :
गुन्ह्यांचा तपास, स्फोटकांचा शोध तसेच बचाव मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस श्वानपथकातील श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलासोबतच ठेवण्याचा संवेदनशील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून घेण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस दलासाठी अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या या मुक्या शूर शिलेदारांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
पोलीस विभागात साधारणपणे दहा वर्षांची सेवा बजावल्यानंतर श्वान निवृत्त होतो. सध्या निवृत्तीनंतर अशा श्वानांना सक्षम व्यक्ती किंवा संस्थेकडे दत्तक देण्याची कार्यपद्धती आहे. मात्र, पोलीस अधिकारी आणि त्यांच्या रखवालदार कर्मचाऱ्यांशी असलेले भावनिक ऋणानुबंध तुटल्याने काही श्वानांनी दत्तक पालकांकडे गेल्यानंतर अन्नत्याग केल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत.
पोलीस श्वान साधारण ६ ते ९ आठवड्यांचा असतानाच पोलीस दलात दाखल होतो. प्रशिक्षणानंतर तो गुन्हेगारांचा माग काढणे, स्फोटके शोधणे, बचावकार्य तसेच विविध तपास मोहिमांमध्ये पोलिसांचा विश्वासू साथीदार म्हणून काम करतो.
गृह विभागाने निवृत्त होणाऱ्या पोलीस श्वानांच्या परिस्थितीबाबत अहवाल सादर केला होता. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत अधिक संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्तीनंतरही या श्वानांना पोलीस दलाशी जोडून ठेवण्याची तरतूद केली जात असून, त्यांच्या आहार आणि देखभालीचा खर्च गृह विभागाला करता येणार आहे.
या निर्णयामुळे श्वानांचा त्यांच्या प्रशिक्षक, अधिकारी आणि रखवालदार कर्मचाऱ्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध कायम राहणार आहे. तसेच आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना परिचित वातावरणात सन्मानाने राहता येणार आहे.
पोलीस दलाचा अविभाज्य घटक असलेल्या या मुक्या शूर शिलेदारांच्या उर्वरित आयुष्याची योग्य आणि सन्मानजनक काळजी घेण्याच्या या निर्णयाचे प्राणीप्रेमी आणि श्वानप्रेमींनी स्वागत केले आहे.