प्रारूप मतदार यादी, हरकती-सुनावणीसाठी नियोजन करा; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश
पुणे/सिंधुदुर्गनगरी :
विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, SIRच्या पुढील टप्प्यासाठी प्रारूप मतदार यादी, हरकती-सुनावणी आणि त्यानंतरच्या कार्यवाहीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित SIR आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अनमॅप्ड मतदारांची स्वतंत्र पडताळणी
SIRच्या पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हे पूर्ण झाला असून, पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी, हरकती व सुनावणीची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर तरतुदी आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पडताळणी करावी, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
नोटीस बजावणी, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणीसाठी इतर राज्यांतील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून स्थानिक परिस्थितीनुसार योग्य कार्यपद्धती स्वीकारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्रे व इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क आणि पडताळणी प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जनजागृतीवर भर
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, जिल्हास्तरीय सोशल मीडिया पथक, प्रसारमाध्यमांशी संबंधित यंत्रणा आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्रिय राहून नागरिकांना प्रक्रियेबाबत अचूक माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.
अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले.
दररोजच्या डेटाचे विश्लेषण करून कामाला गती
डॅशबोर्डवर दररोज उपलब्ध होणाऱ्या डेटाचे विश्लेषण करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे स्पष्ट लक्ष्य द्यावे आणि निर्धारित कालमर्यादेत प्रकरणे निकाली काढावीत, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले. प्रलंबित तांत्रिक कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
SIRच्या पहिल्या टप्प्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व शुद्ध करण्यास मदत झाली असून, पुढील टप्पा अधिक आव्हानात्मक असला तरी स्पष्ट नियोजन, दैनंदिन डेटा विश्लेषण, कायदेशीर प्रक्रियेचे पालन आणि नागरिकांशी पारदर्शक संवाद यांच्या माध्यमातून तो यशस्वीपणे पूर्ण करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची तयारी सादर
बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील SIRच्या कामकाजाचे सादरीकरण केले. हाऊस-टू-हाऊस सर्व्हे, एन्यूमरेशन फॉर्मचे वितरण व संकलन, मतदार नोंदींचे मॅपिंग, डिजिटलायझेशन तसेच अनमॅप्ड, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या पडताळणीची सद्यस्थिती त्यांनी मांडली.
आगामी प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन, हरकती आणि सुनावणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी याबाबतही त्यांनी माहिती दिली.