लांज्यात भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लांज्यात भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘या स्पर्धेत धावणारा प्रत्येक बालस्पर्धक विजेता’ – रविंद्र सामंत
लांजा :
श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डी. जे. सामंत इंग्लिश मीडिया स्कूल, लांजा आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष रविंद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी बालस्पर्धकांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला आणि त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रविंद्र सामंत म्हणाले की, सहभागी झालेले छोटे खेळाडू हेच उद्याचे भविष्य आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नसून आजच्या तरुण पिढीने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. खेळामुळे मुलांमध्ये शिस्त, जिद्द, संघभावना तसेच पराभवाने खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची क्षमता निर्माण होते.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक बालस्पर्धक हा विजेताच आहे. कोण पहिला आला किंवा कोण दुसरा आला, यापेक्षा स्पर्धेत उत्साहाने आणि जिद्दीने सहभागी होणे हेच मुलांचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
या क्रीडा सोहळ्यास आमदार किरणजी भैय्या सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत, लांजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सावली कुरुप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्य उमेश पत्की आणि पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह लांजा तालुक्यातील विविध शाळांमधील बालस्पर्धक, पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच क्रीडाविषयक आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त आणि खिलाडूवृत्तीला चालना देणारा हा क्रीडा उपक्रम ठरला.