गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांनी केली पाहणी
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांनी केली पाहणी
वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा संकल्प
नागपूर :
वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पाहणी केली.
यावेळी उद्यानातील विविध वन्यजीव, उपलब्ध सुविधा तसेच वन्यजीव संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. उद्यानाचा विकास करताना वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन यांना प्राधान्य देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे या प्रयत्नांचे महत्त्वाचे केंद्र असून, ते अधिक सक्षम करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नमूद केले.
या पाहणीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख एम. श्रीनिवास राव, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार यांच्यासह वन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणी उद्यानाच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनासोबतच नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यटनाचा अनुभव मिळावा आणि नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणाला बळ मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर शासनाचा भर राहणार आहे.