कोमसाप दापोलीच्या वतीने ४ सप्टेंबरला ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन
कोमसाप दापोलीच्या वतीने ४ सप्टेंबरला ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन
विद्यार्थ्यांच्या कवितांना मिळणार व्यासपीठ
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली : श्रावणमास आणि कवी यांचे पूर्वापार एक अतूट नाते आहे. श्रावणातील निसर्गसौंदर्य, बरसणाऱ्या सरी, सण-उत्सव आणि हिरवाई कवीच्या प्रतिभेला नेहमीच साद घालत आली आहे. याच काव्यमय वातावरणाचा अनुभव देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोली आणि ए.जी. हायस्कूल, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणसरी’ या काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ए.जी. हायस्कूल, दापोली येथील माधवराव कोकणे सभागृहात हे काव्यसंमेलन रंगणार आहे.
या काव्यसंमेलनात दापोलीतील जयवंत चव्हाण, बाबू घाडीगांवकर, प्रा. के. एस. शिरबंदे, सुनील कदम, प्रा. कैलास गांधी, संदीप यादव आणि रेखा जेगरकल हे निमंत्रित कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, ए.जी. हायस्कूलमधील विद्यार्थीही स्वलिखित कविता सादर करून आपल्या काव्यप्रतिभेची झलक दाखवणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ कवी तथा गझलकार सुदेश मालवणकर हे ‘काव्यलेखन – तंत्र आणि मंत्र’ या विषयावर विद्यार्थ्यांना व काव्यरसिकांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नवोदित कवींना काव्यलेखनाच्या विविध पैलूंचे मार्गदर्शन मिळणार आहे.
काव्यसंमेलनात उल्लेखनीय काव्यवाचन करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी निमंत्रित कवींनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दापोलीतील साहित्यप्रेमी, काव्यरसिक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘श्रावणसरी’ हे काव्यसंमेलन साहित्यिक मेजवानी ठरणार असून, नवोदित कवींना आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळणार आहे.
कार्यक्रमाची माहिती कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांनी दिली.