सिंधुदुर्ग विभागाची १० सप्टेंबरला डाक अदालत; तक्रारी ७ सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग विभागाची १० सप्टेंबरला डाक अदालत; तक्रारी ७ सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग विभागातील डाक सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयात ही डाक अदालत होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर एन. टी. कुरळपकर यांनी दिली.
पोस्टाची सेवा ही देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. नागरिकांना दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांचे समाधान करण्यासाठी पोस्ट विभागाकडून विविध प्रयत्न केले जातात. मात्र सेवा देताना निर्माण होणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना तक्रारी करण्याची वेळ येते. अशा तक्रारींचे योग्य निवारण करण्यासाठी डाक अदालत आयोजित केली जाते.
पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबाबतच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे.
विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनिऑर्डर यासंबंधीच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रार करताना संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपशील, तक्रारीची तारीख तसेच ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार पाठविण्यात आली होती त्यांचे नाव व हुद्दा नमूद करणे आवश्यक आहे.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार एन. टी. कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी – ४१६८१२ यांच्या नावे ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल, अशा पद्धतीने पाठवावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.