रत्नागिरीत ८ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरीत ८ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
महसूल विभागातील ६, पोलीस व पाटबंधारे विभागातील प्रत्येकी २, तर आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यावर कारवाई; भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन
रत्नागिरी :
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. चालू वर्षातील जानेवारीपासून अवघ्या आठ महिन्यांत ८ प्रकरणांमध्ये एका खासगी मध्यस्थासह एकूण ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
एसीबीच्या या कारवाईत सर्वाधिक महसूल विभागातील ५ प्रकरणांत ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि १ कोतवाल यांचा समावेश आहे. शासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात एसीबीने ही कारवाई केली.
विभागनिहाय कारवाईचा तपशील पाहता, पोलीस प्रशासनातील एका प्रकरणात १ पोलीस उपनिरीक्षक आणि १ खासगी व्यक्ती, तर सार्वजनिक पाटबंधारे विभागातील एका प्रकरणात १ कार्यकारी अभियंता आणि १ लिपिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागातील एका प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी विनाकारण अडवणूक करून लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्याला बळी न पडता थेट विरोध करावा. लाच मागणाऱ्याइतकाच लाच देणाराही कायद्याने दोषी ठरतो, त्यामुळे नागरिकांनी लाच देण्यास स्पष्ट नकार देऊन भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.
ऑडिओ-व्हिडिओ पुराव्यासह तक्रार करा
लाचेची मागणी होत असल्यास किंवा लाच स्वीकारली जात असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रसंगावधान राखून मोबाईल अथवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध होणारा ऑडिओ किंवा व्हिडिओ पुरावा सुरक्षित ठेवावा. हा डिजिटल पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत पोर्टलवरील तसेच मोबाईल ॲपमधील Complaint Panel वर तक्रारीसोबत सादर करता येतो.
भ्रष्टाचाराला मुळापासून आळा घालण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही लाचखोरीच्या प्रकरणात एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाच देण्यास आणि घेण्यास स्पष्ट नकार देऊन नागरिकांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. त्यातून स्वच्छ, गतिमान आणि पारदर्शक प्रशासन उभारण्यास मदत होईल, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.