मराठा-कुणबी प्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी ९ सप्टेंबरला उच्चस्तरीय बैठक
मराठा-कुणबी प्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी ९ सप्टेंबरला उच्चस्तरीय बैठक
प्रलंबित प्रश्नांचा निपटारा व कार्यपद्धतीतील त्रुटींवर होणार चर्चा; डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
छत्रपती संभाजीनगर :
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी व अडचणी दूर करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात होणार आहे. बैठकीत प्रलंबित प्रश्नांचा निपटारा, आवश्यक उपाययोजना तसेच प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.
क्षेत्रीय स्तरावर प्रमाणपत्र देताना येणाऱ्या अडचणी, कार्यपद्धतीतील त्रुटी आणि प्रलंबित प्रकरणांवर सखोल चर्चा करून पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सामंत यांनी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील, विभागातील सातही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा, जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जालना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
९ सप्टेंबरच्या उच्चस्तरीय बैठकीत क्षेत्रीय स्तरावरील बाबींचा सखोल आढावा घेऊन मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.