राष्ट्रीय लोकअदालतीत रायगडची उल्लेखनीय कामगिरी; १०,७०३ प्रकरणे सामंजस्याने निकाली
राष्ट्रीय लोकअदालतीत रायगडची उल्लेखनीय कामगिरी; १०,७०३ प्रकरणे सामंजस्याने निकाली
रायगड :
शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीला रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकअदालतीसमोर ठेवण्यात आलेल्या ५०,४९० प्रकरणांपैकी तब्बल १०,७०३ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण ₹५८ कोटी ८ लाख ७२ हजार ३९८ रुपयांची तडजोड झाली.
यामध्ये ५,४६४ दाखलपूर्व आणि ५,२३९ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ₹३.७८ कोटी, तर प्रलंबित प्रकरणांमध्ये ₹५४.२९ कोटींची तडजोड झाली.
व्हिडिओ कॉलद्वारेही प्रकरणांचा निपटारा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पक्षकारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून आवश्यक पडताळणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
चार दाम्पत्यांचे संसार पुन्हा जुळले
रोहा, महाड आणि खालापूर येथील चार दाम्पत्यांचे वैवाहिक वाद सामंजस्याने मिटविण्यात यश आले. लोकअदालतीत एकूण २३ वैवाहिक वादांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मोटार अपघात प्रकरणांतही मोठी कामगिरी
मोटार अपघाताच्या एकूण ५१९ दावा प्रकरणांपैकी ७० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. संबंधित पक्षकारांना ₹७ कोटी ७० लाख ७३ हजार ४४२ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.
या यशस्वी आयोजनासाठी न्यायिक अधिकारी, अधिवक्ते, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सर्व संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी आभार मानले.