खदान पोलीस ठाणे, अकोला येथील पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत एका आरोपीस अटक केली. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ६९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून पोलिस पथकाने प्रभावी तपास करत आरोपीला अटक केली.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘सर्वोत्कृष्ट गुन्हा उकल’ या श्रेणीत खदान पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली. गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून आरोपीला अटक तसेच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यात आला.