रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४३६ नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनाने पदस्थापना

0
12
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४३६ नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनाने पदस्थापना
रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४३६ नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनाने पदस्थापना

रत्नागिरी जिल्हा परिषदेत ४३६ नवनियुक्त शिक्षकांना पारदर्शक समुपदेशनाने पदस्थापना

रत्नागिरी :
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना आता नव्या शिक्षकांच्या रूपाने नवी ऊर्जा मिळणार आहे. ‘पवित्र पोर्टल’द्वारे निवड झालेल्या प्राथमिक व पदवीधर संवर्गातील तब्बल ४३६ नवनियुक्त शिक्षकांचा समुपदेशन व पदस्थापना आदेश वाटप सोहळा जिल्हा परिषदेत नियोजनबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होताच त्याच दिवशी नियुक्ती आदेश हातात मिळाल्याने नवनियुक्त शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.

या प्रक्रियेत २०८ उपशिक्षक आणि २२८ पदवीधर शिक्षकांना गुणवत्ताक्रमानुसार थेट शाळा निवडीची संधी देण्यात आली. दिव्यांग उमेदवार, आजारी व्यक्ती तसेच महिला शिक्षकांच्या सोयींचाही संवेदनशीलतेने विचार करण्यात आला. प्रत्येक उमेदवाराला शाळा निवडण्यासाठी पुरेसा वेळ आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आजारी व शारीरिक व्याधी असलेल्या उमेदवारांची स्वतः आस्थेने विचारपूस करून त्यांच्या आरोग्याच्या व प्रवासाच्या दृष्टीने सोयीची शाळा निवडण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी सभापती महेश नाटेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे आणि रेवती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्या शिक्षकांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून निघण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगणे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नियुक्ती आदेश हातात आणि ज्ञानदानाची नवी उमेद मनात घेऊन हे ४३६ नवनियुक्त शिक्षक आता रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांतील शाळांमध्ये रुजू होण्यासाठी रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here