मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; उरणमध्ये माकपची जोरदार निदर्शने
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; उरणमध्ये माकपची जोरदार निदर्शने
उरण :
उरण, दि. २७ :
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची तसेच निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रविवारी उरणच्या गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात माकपसह सीआयटीयू, जनवादी महिला संघटना, किसान सभा आणि डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी आंदोलकांनी ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’, ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘मोदी सरकार चले जाव’, ‘एसआयआर रद्द करा’, तसेच वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे, कामगार नेते भूषण पाटील, संजय ठाकूर, हेमलता पाटील, शेकापचे रवी घरत आणि शशी यादव यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत (SIR) माकप आणि सहभागी संघटनांनी गंभीर आक्षेप व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांची सखोल चौकशी करावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांसह संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत देशभरात राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना आयोगाकडूनही SIR आणि संबंधित मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.