रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या १५ ‘पर्यटन मित्रां’चा सन्मान : उदय सामंत
रत्नागिरीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या १५ ‘पर्यटन मित्रां’चा सन्मान : उदय सामंत
रत्नागिरी :
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ ‘पर्यटन मित्रां’चा सन्मान करण्यात आला. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वैद्यकीय पर्यटन, होम स्टे, हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन, फोटोग्राफी, पत्रकारिता, साहसी पर्यटन तसेच स्थानिक कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार किरण (भैय्या) सामंत, आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, कोकण ग्लोबलचे अध्यक्ष संजय यादवराव, समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण, पर्यटन तज्ज्ञ डॉ. श्रीधर ठाकूर, डॉ. चंद्रशेखर निमकर, संजय वैशंपायन, आनंदी नारायण आणि संयोनी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या सर्व ‘पर्यटन मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्राला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी स्थानिक पातळीवरील योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.