सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; बाधित प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे निर्देश

0
12
सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; बाधित प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे निर्देश
सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; बाधित प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे निर्देश

सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; बाधित प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यास प्राधान्य असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला शासनाच्या मदतीचा लाभ मिळेल, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
बाधित शेतकऱ्यांना मदत देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करण्यासाठी कृषी विभागासह संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शासनाच्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी आवश्यक माहिती अचूकपणे संकलित करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. नुकसानग्रस्त क्षेत्र, पिकांचे नुकसान आणि पात्र लाभार्थी याबाबतची माहिती अचूक असल्याची खात्री करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती आणि मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेशजी राणे, आमदार दीपक केसरकर (ऑनलाइन), जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य ऑनलाइन प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here