शिक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ दापोलीचा सेवाभावी हात; दोन शाळांना ३० बेंचेसची भेट
शिक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ दापोलीचा सेवाभावी हात; दोन शाळांना ३० बेंचेसची भेट
दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना आनंददायी आणि सुखकर वातावरण मिळावे, या सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब ऑफ दापोलीच्या वतीने मराठा मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली आणि श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, दापोली या दोन्ही शाळांना ३० बेंचेसची भेट देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा रोटरी क्लब ऑफ दापोलीच्या पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी रो. विनोद तलाठी, रो. संदीप बागायतदार, रो. प्रसाद सागवेकर, रो. पालशेतकर, रो. लीना खोचरे, रो. संदीप सावंत, रो. संदीप खोचरे, रो. अजय कानडे, रो. संगीता तलाठी आणि रो. संज्योत सावंत यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन रोटरी क्लबने केलेली ही मदत केवळ बेंचेसची भेट नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिलेली साथ, त्यांच्या स्वप्नांना दिलेला आधार आणि उज्ज्वल भवितव्यावर व्यक्त केलेला विश्वास असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना रो. विनोद तलाठी यांनी समाजाच्या गरजा ओळखून सर्वतोपरी मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले. शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, विद्यार्थ्यांच्या गरजांसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता मांडवकर यांनी केले, तर शेवटी रो. लीना खोचरे यांनी आभार मानले. दोन्ही शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मुख्य प्रशासक प्रा. कुणाल मंडलिक यांनी रोटरी क्लब ऑफ दापोलीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात आलेली ३० बेंचेसची ही भेट शैक्षणिक सुविधांना बळ देणारी ठरली असून, सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.