रत्नागिरी RTO कडून दुचाकींसाठी ‘MH-08-BP’ नवीन मालिका
रत्नागिरी RTO कडून दुचाकींसाठी ‘MH-08-BP’ नवीन मालिका
पसंतीच्या क्रमांकासाठी ६ व ७ ऑक्टोबरला अर्ज
रत्नागिरी :
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP-0001 ते MH-08-BP-9999’ ही नवीन नोंदणी मालिका ६ ऑक्टोबर २०२६पासून सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज आणि लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याबरोबरच कार्यालयीन व्यवस्थेवरील ताण कमी करून इच्छुकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी ही विशेष कार्यपद्धती राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.
चारचाकी व इतर परिवहन वाहनांसाठी अर्ज
नवीन दुचाकी मालिकेतील पसंतीचा क्रमांक चारचाकी अथवा इतर परिवहन वाहनांसाठी घ्यायचा असल्यास संबंधित वाहनधारकांनी तीनपट शुल्क भरून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
प्राप्त अर्जांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ३ वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अर्जदारांनी जादा रकमेचा डीडी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात जमा करावा. सायंकाळी ४.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडण्यात येतील आणि सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक देण्यात येईल.
दुचाकींसाठी आकर्षक क्रमांकाची प्रक्रिया
दुचाकी वाहनांच्या मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. प्राप्त अर्जांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ३ वाजता नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक दावेदार असल्यास जादा रकमेचा डीडी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात जमा करावा लागेल. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता लिलाव पद्धतीने सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या अटी
अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्ड, वैध ओळख पुराव्याच्या साक्षांकित प्रती आणि विहित शुल्काचा डीडी सादर करणे आवश्यक आहे. अर्ज नवीन नोंदणी विभागात जमा करावा.
डीडी ‘DY RTO RATNAGIRI’ यांच्या नावे आणि रत्नागिरी येथे देय असलेला राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून दिला जाणार नाही. क्रमांक आरक्षित केल्याच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास आरक्षित क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासनजमा केले जाईल. जमा केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत अथवा समायोजित केले जाणार नाही.