समीक्षा एंटरप्राइजेसच्या कामाची चौकशी करा – नगराध्यक्षा भावना घाणेकर

0
17
समीक्षा एंटरप्राइजेसच्या कामाची चौकशी करा - नगराध्यक्षा भावना घाणेकर :
समीक्षा एंटरप्राइजेसच्या कामाची चौकशी करा - नगराध्यक्षा भावना घाणेकर :

समीक्षा एंटरप्राइजेसच्या कामाची चौकशी करा – नगराध्यक्षा भावना घाणेकर

उरणच्या स्वच्छतेशी तडजोड नाही

उरण प्रतिनिधी :
उरण नगरपरिषद हद्दीतील कचरा संकलन, कचरा उचलणे आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्याचे काम समीक्षा एंटरप्राइजेस या कंत्राटदारामार्फत केले जाते. या कामासाठी नगरपरिषदेची वाहने वापरण्यात येत असून, या वाहनांची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे.
मात्र शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी कचरा अर्धवट उचलला जात असल्याचे, नियमित कचरा संकलन होत नसल्याचे तसेच डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचीही नियमित विल्हेवाट होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
काम समाधानकारक नसताना संबंधित कंत्राटदाराला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.
“नगराध्यक्ष म्हणून जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून मी गप्प बसणार नाही. उरणकरांच्या करातून उभारलेली नगरपरिषदेची वाहने ही जनतेची मालमत्ता आहे. उद्या कंत्राटदाराने काम सोडले, तर वाहनांची झीज, नुकसान, दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी कोण घेणार, याचे स्पष्ट उत्तर मिळाले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी, नगरपरिषदेच्या वाहनांची स्थिती आणि संभाव्य नुकसान तपासावे तसेच दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“उरणच्या स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणताही राजकीय दबाव किंवा तडजोड मी स्वीकारणार नाही. जनतेच्या हितासाठी आवश्यक ती प्रत्येक कारवाई करण्यासाठी मी ठामपणे उभी आहे,” असे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here