कोमासापचे २०२४–२५ चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर; सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना लक्षवेधी पुरस्कार

0
6
कोमासापचे वार्षिक वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
कोमासापचे वार्षिक वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

कोमासापचे २०२४–२५ चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर; सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना लक्षवेधी पुरस्कार

मंगेश मस्के यांना कोमासाप कार्यकर्ता पुरस्कार; मराठी साहित्य, संस्कृती आणि सामाजिक योगदानाचा गौरव

सिंधुदुर्ग-
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमासाप) सन २०२४–२५ या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. विविध साहित्यप्रकारांतील लेखक, कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही विशेष स्थान मिळाले असून, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना, तर गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमासाप कार्यकर्ता पुरस्कार जिल्हाध्यक्ष मंगेश आत्माराम मस्के यांना जाहीर झाला आहे.
विविध साहित्यप्रकारांतील साहित्यिकांचा गौरव
कादंबरी विभागात र. वा. दिघे स्मृती पुरस्कार विवेक गोविलकर यांच्या सिंफनी या कादंबरीला, तर वि. वा. हडप स्मृती पुरस्कार उदय जोशी यांच्या संघर्षपर्व या कादंबरीला मिळाला. कथा विभागात वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टिफन परेरा यांच्या काळवेळ या कथासंग्रहाला, तर विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार अशोक लोटणकर यांच्या निराधार या कथासंग्रहाला जाहीर झाला.
कविता विभागात आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उडवाच मान माझी या काव्यसंग्रहाला, तर वसंत सावंत स्मृती पुरस्कार विलास गावडे यांच्या व्यक्त होतोय मी या काव्यसंग्रहाला मिळाला. आत्मचरित्र विभागातील धनंजय कीर स्मृती पुरस्कार आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या क्षण सोनेरी–रुपेरी आणि काटेरी या ग्रंथाला, तर चरित्र विभागातील श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार शामसुंदर गावकर यांच्या भरती–ओहोटी या चरित्राला जाहीर झाला.
समीक्षा विभागात डॉ. शिल्पा जोशी यांच्या मंगेश पाडगावकरांचे गीत–काव्य या ग्रंथाला प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार मिळाला. नाटक विभागातील भाई भगत पुरस्कार अरुण तुकाराम मोर्ये यांच्या कृष्णा माझं काय चुकलं या नाटकाला जाहीर झाला. ललित गद्य विभागात वर्षा कुवळेकर यांच्या सफर खूबसुरत है मंजिलसे या ग्रंथाला अनंत काणेकर स्मृती पुरस्कार, तर नितीन तेंडुलकर यांच्या अधिक उंच उडता उडता या साहित्यकृतीला सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार मिळाला.
बालवाङ्मय विभागात डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या शशा रे सशा या ग्रंथाला प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार मिळाला. संकीर्ण विभागात डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या कातळशिल्पांच्या पाऊलखुणा या ग्रंथाला वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार, तर रविराज गंधे यांच्या महासागर या ग्रंथाला अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला. वैचारिक विभागात रेखा कोरे यांच्या महात्मा बसवेश्वर–कृतीतून प्रगतीकडे या ग्रंथाला फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार मिळाला.
विशेष पुरस्कारांमध्ये डंकी रूटसाठी प्रकाश पाटील, ॲडजस्टमेंटसाठी मेघना साने आणि तिमिरातून तेजाकडेसाठी डॉ. जिवबा केळुसकर यांची निवड झाली. संपादन विभागात वलयांकित चंद्रसाठी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी आणि आठवचित्रेसाठी प्रज्ञा जांभेकर यांना विशेष पुरस्कार जाहीर झाले.
वाङ्मयेतर पुरस्कारांतही मान्यवरांचा गौरव
वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे यांना जाहीर झाला. कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार विद्याभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक नर यांना, तर साहित्य, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. बा. कारखानीस पुरस्कार मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील मुरारी तथा बंधू मयेकर यांना मिळाला.
गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमासाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष मंगेश आत्माराम मस्के आणि ठाणे जिल्हाध्यक्ष तुकाराम विठ्ठल तथा बाळ कांदळकर यांना जाहीर झाला. राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार पुष्पा कोल्हे आणि शुभदा मुळ्ये यांना मिळाला. वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमासाप शाखा पुरस्कार चेंबूर आणि मुरुड–जंजिरा शाखांना देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रायगडच्या संध्या दिवकर आणि सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना जाहीर झाला. महाविद्यालयीन लेखिका विद्यार्थिनींसाठीचा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार पालघरच्या संस्कृती महेंद्र तांडेल यांना, तर कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार मालगुंडचे अमेय धोपटकर यांना मिळाला. कोमासाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याचे प्रवीण सोनावणे यांना जाहीर झाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
सर्व पुरस्कारविजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासह कोमासाप परिवाराने सर्व पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here