करवणे येथे मत्स्यबीज केंद्र उभारणार; वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामालाही गती देणार
करवणे येथे मत्स्यबीज केंद्र उभारणार; वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामालाही गती देणार
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक; जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाला समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना
रत्नागिरी :
चिपळूण तालुक्यातील करवणे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यबीज केंद्र उभारणे आणि वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला गती देण्याबाबत मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.
करवणे येथील शासकीय जमीन वाशिष्ठी नदीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असल्याने या ठिकाणी मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी ती पूरक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या जागेसंदर्भातील आवश्यक ठराव मंजूर करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मत्स्यबीज केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.
वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामावर चर्चा
चिपळूण येथील वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या कामासाठी बंदरे विभागाकडून आवश्यक परवानग्या देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
वाशिष्ठी खाडीतील गाळ काढण्याच्या कामासाठी बंदरे विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असा विश्वासही मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
या बैठकीला आमदार शेखर निकम, पदुम विभागाचे सचिव एन. रामास्वामी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.