महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांना ५० हजारांचे प्रथम पारितोषिक

0
16
महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांना ५० हजारांचे प्रथम पारितोषिक
महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांना ५० हजारांचे प्रथम पारितोषिक

महाड सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांना ५० हजारांचे प्रथम पारितोषिक

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व समतेचा जागर; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीची संधी

नागपूर :
महाड चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील पात्र पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आपले विचार मांडण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यस्तरीय विजेत्यांना आकर्षक पारितोषिके
राज्यस्तरावर पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही गटांतील विजेत्यांना स्वतंत्रपणे पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास ३० हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय, विद्यापीठ स्तरावरही पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही गटांसाठी स्वतंत्र पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नोंदणी आणि निबंध सादरीकरणाच्या तारखा
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. निबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत स्वहस्ताक्षरात लिहून ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावा.
स्पर्धेचे नियम, अटी, पात्रता आणि निबंध सादर करण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना अपात्रता
कृषी, पशुविज्ञान, मत्स्यविज्ञान आणि आरोग्यविषयक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्वी स्पर्धेची पात्रता आणि नियम तपासून घ्यावेत.
महाड चवदारतळे सत्याग्रह आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here