राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची चमक; श्रद्धा लोंढे हिला प्रथम क्रमांकासह विशेष सुवर्णपदक
राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची चमक; श्रद्धा लोंढे हिला प्रथम क्रमांकासह विशेष सुवर्णपदक
‘सुपर ६०’मध्ये महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांची निवड; दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी एआय प्रकल्प सादर करणाऱ्या श्रद्धाचे उल्लेखनीय यश
मुंबई :
बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यातून सहभागी झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांनी देशातील उत्कृष्ट ६० प्रकल्पांच्या ‘सुपर ६०’ गटात स्थान मिळविले आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी श्रद्धासह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन विज्ञानाधारित प्रकल्प सादर केले. महाराष्ट्रातील २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले.
प्रकल्पांचे नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, वापरण्यातील सुलभता आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता या निकषांवर उत्कृष्ट ६० प्रकल्पांची ‘सुपर ६०’ गटासाठी निवड करण्यात आली. या प्रतिष्ठित गटात महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव येथील विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ हा प्रोटोटाइप सादर केला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना सहाय्य करण्याच्या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. श्रद्धाने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासह विशेष सुवर्णपदक पटकाविले. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले.
‘सुपर ६०’मध्ये श्रद्धा लोंढे हिच्यासह सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद स्कूल, लक्ष्मीवाडी येथील राजवर्धन प्रदीप काळे; पुण्यातील एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची देविका सुहास ताड; सिटी प्राइड स्कूलचा अर्णव भुसारी; डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची गीता गणपत धनवडे; सोलापूर जिल्ह्यातील के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोट येथील शांभवी रामनप्पा अजगुंडे आणि वाशिम येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विराज संदीप शिंदे यांची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची वैज्ञानिक कल्पकता आणि संशोधनवृत्ती अधोरेखित झाली आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणामार्फत ‘सुपर ६०’मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे.