
सिंधुदुर्गात ५१,१०५ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; २६,५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाकडे
सिंधुदुर्ग :
खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ५१ हजार १०५ शेतकऱ्यांच्या एकूण २६ हजार ५६५.७८ हेक्टर बाधित क्षेत्रातील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. या नुकसानीचा एकत्रित अहवाल कृषी आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला असून, सध्या बाधित क्षेत्राच्या सत्यापनाची (ग्राउंड ट्रुथिंग) प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी समन्वयाने पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण केली.
जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण, कणकवली, देवगड, वेंगुर्ला आणि कुडाळ या आठही तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतीची माहिती संकलित करण्यात आली आहे. पीकनिहाय बाधित क्षेत्राचे वर्गीकरण करून शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीने पंचनामे अचूकपणे पूर्ण करणे, माहितीची पडताळणी करणे आणि तालुकानिहाय अहवाल वेळेत सादर करण्यावर प्रशासनाने भर दिला.
तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे :
-
दोडामार्ग : १,७३० शेतकरी, ७४९.५० हेक्टर बाधित क्षेत्र.
-
सावंतवाडी : ६,४६६ शेतकरी, ३,२४५.२९ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
वैभववाडी : ३,८७३ शेतकरी, १,३९१.५९ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
मालवण : ७,७५७ शेतकरी, ४,७३३.२७ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
कणकवली : ८,७१२ शेतकरी, ४,५३६ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
देवगड : ६,२९० शेतकरी, १,९६९.१९ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
वेंगुर्ला : २,९१९ शेतकरी, ९८०.६५ हेक्टर बाधित क्षेत्र.
-
कुडाळ : १३,३५८ शेतकरी, ८,९६०.२९ हेक्टर बाधित क्षेत्र.

